जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी
Jayakwadi Dam Water 2023 : मराठवाड्यात जेव्हा-जेव्हा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी नेहमी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील (Marathwada) पाण्याचा वाद पाहायला मिळतो. यंदा देखील असाच वाद पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण, जायकवाडीत 47 टक्के पाणीसाठा असून, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांत 95 टक्के साठा आहे. तर 17 ऑक्टोबरला समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत पाण्याचा हिशेब झाल्यानंतर ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणांतून जायकवाडी (Jayakwadi Dam) प्रकल्पासाठी पाणी सोडण्याची प्रक्रिया देखील तातडीने करावी, अशी मागणी मराठवाड्यातील आमदारांकडून आत्तापासूनच करण्यात येत आहे.
पाटबंधारे विकास महामंडळाला पत्र
आमदार सतीश चव्हाण, प्रशांत बंब यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे पत्र पाठवून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. समन्यायी पाणी वाटपाबाबत बैठकीनंतर मराठवाड्याच्या वाट्याला येणारें पाणी तत्काळ सोडण्याची मागणी आमदार चव्हाण आणि बंब यांनी केली आहे. सध्या गोद्वारी नदीपात्रात पाणी असून, त्यामुळे आता पाणी सोडले तर पाण्याचा अपव्यय होणार नाही. तसेच जास्तीत जास्त पाणी जायकवाडीपर्यंत पोहोचेल, असे आमदार प्रशांत बंब यांनी सांगितले आहे. त्यामुळे, बैठकीत होणाऱ्या निर्णयानंतर आता वरील धरणातून पाणी सोडले जाणार का? याकडे मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.